अकारावी प्रवेश प्रकियेसाठी विद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करावी, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना
अकारावी प्रवेश प्रकियेसाठी विद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करावी, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना
पुणे, ता. २१ - येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक आणि वेळेवर भरण्यासाठी शासकीय, अनुदानित विद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करावी, अशी सूचना माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यालयांना दिल्या आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे याबाबत कळवले आहे. गेल्यावर्षी राज्यभरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास विलंब झाल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरु राहिली. त्यामुळे यंदा वेळेत प्रवेशप्रक्रिया पार पडावी यासाठी मार्गदर्शन केंद्र स्थापनेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व मदत करावी, विद्यार्थी-पालक-शाळा समन्वय साधला जावा, यादृष्टीने विशेष कार्यशाळा आयोजित कराव्यात अशीही सूचना देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११ वी प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे अर्ज करावा. अन्य मंडळाशी संलग्न शाळांतून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य मंडळ संलग्न महाविद्यालयातील ११ वी च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया निकषांनुसार सुरु राहणार आहे. प्रवेशासाठी घटनात्मक आरक्षण लागू असेल. त्यानुसार पहिल्या तीन नियमित फेऱ्यांतर्गत राखीव प्रवर्गानुसार जागा भरण्यात येतील. नंतरच्या फेऱ्यांमध्ये राखीव प्रवर्गाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास रिक्त जागा खुल्या होणार आहेत. विद्यार्थ्यांनी संबंधित प्रमाणपत्रे वेळेपूर्वीच प्राप्त करुन ठेवावीत, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आवश्यक कागदपत्रांमध्ये दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचा अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थ्यांसाठी महिला आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रमाणपत्र या कागदपत्रांचा समावेश आहे.