'अंतर्नाद'मधून रसिकांनी रंगमंचावर अनुभवला वारीचा सुंदर सोहळा
पिंपरी, ता. १ जुलै २०२६ - मोरया थिएटर्स निर्मित 'अंतर्नाद –अ जर्नी टू द सोल' या संगीत नाटकाने प्रेक्षकांना पंढरीच्या वारीचा अनुभव दिला. विठ्ठलभक्ती, अध्यात्म, विज्ञान आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम घडवत या नाटकाने रंगभूमीवर अध्यात्मिक सोहळा उभा केला आहे.
लेखक विनोद रत्ना यांच्या अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखणीतून साकारलेली कथा तसेच दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांच्या नावीन्यपूर्ण मांडणीमुळे हा प्रयोग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. आधुनिक विचारसरणी असलेल्या एका युवकाचा अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे, नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे आणि केवळ तर्काच्या चौकटीतून अध्यात्माच्या अनुभूतीकडे होणारा प्रवास नाटकात प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे.
विशेष म्हणजे तब्बल २५ हून अधिक कलाकार एकाच वेळी रंगमंचावर सहजतेने वावरताना दिसतात. त्यांची ऊर्जा, समन्वय आणि भूमिकांप्रती असलेली निष्ठा प्रत्येक दृश्यात जाणवते. कुठेही कृत्रिमता न वाटता कलाकारांचा नैसर्गिक अभिनय आणि भावपूर्ण सादरीकरण प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवते. नाटकातील नवीन गीते, संहितेला पूरक असलेले रंगमंचावरील लाईव्ह संगीत, प्रभावी नृत्यदिग्दर्शन, नेत्रदीपक प्रकाशयोजना आणि पारंपरिक वारकरी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारे प्रसंग यामुळे प्रेक्षकांना आपण नाटकगृहात बसलो आहोत की प्रत्यक्ष वारीत सहभागी झालो आहोत, असा भास होतो.
वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून जीवन जगण्याची पद्धत आहे, हा संदेश नाटक अत्यंत प्रभावीपणे पोहोचवते. श्रद्धा, संस्कार, समता, भक्ती आणि अध्यात्म यांचा अर्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम ‘अंतर्नाद’करत असल्याचे जाणवते. हा भव्य-दिव्य आणि अभूतपूर्व प्रयोग साकारल्याबद्दल निर्माते भाऊसाहेब भोईर आणि संपूर्ण मोरया थिएटर्सच्या टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजात सकारात्मक संस्कार रुजवणारी आणि वारकरी परंपरेचे महत्त्व नव्या पिढीसमोर मांडणारी ही कलाकृती प्रत्येकाने किमान एकदा तरी अनुभवावी, अशी भावना नाटक पाहिलेल्या रसिकांनी व्यक्त केली.