ज्येष्ठ दिग्दर्शिका-अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन
पुणे, ता. १ - मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका व अभिनेत्री विजया मेहता यांचे मंगळवारी (ता. 30) मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत मानाच्या आणि अग्रगण्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या होत्या. मराठी नाट्यविश्वात त्यांना आदराने 'बाई' म्हणून ओळखले जायचे. विजय मेहता यांचा जन्म हा गुजरातमधील बडोद्यात ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्लीत विख्यात रंगकर्मी इब्राहिम अल्काझी आणि मुंबईत आदि मर्झबान यांच्याकडे अभिनयाचे आणि नाट्यशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतले. झिम्मा हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
1960 च्या दशकात त्यांनी विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली. या चळवळीमुळे मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी मांडणी आणि जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली. 'संशयकल्लोळ', 'तुझे आहे तुजपाशी' आणि 'सुंदर मी होणार' या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नाटकाचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी अनेक पिढ्यांतील कलाकार घडवले. विजयाबाईंच्या मार्गदर्शनाखाली विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले.
विजया मेहता यांना नाट्यदर्पण पुरस्कार, पद्मश्री, महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार, त्यांनी लिहिलेल्या 'झिम्मा' सिनेमाला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार, रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 'झिम्मा' या आत्मचरित्राला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, विष्णूदास भावे सुर्वणपदक, संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या, दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. प्रारंभी अभिनयातून आपली छाप उमटवल्यानंतर पुढे त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. एकाहून एक असे सरस नाट्य कलावंत त्यांनी घडवले. चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या. एका पिढीचे प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.", अशी भावना त्यांनी व्यक्त केली.