आषाढी वारी पालखी सोहळा उद्या पुण्यातून मार्गस्थ होणार असल्याने वाहुकीत बदल
पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळा शनिवारी (ता. ११) श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे, शहराच्या मध्यवर्ती भागातील नाना पेठ, भवानी पेठेसह पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत शनिवारी मध्यरात्री दोनपासून टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार आहेत. पालखी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे-वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होईल. दोन्ही पालख्या लष्कर भागात एकत्र येतील. तेथून पुणे-सोलापूर महामार्गाने दोन्ही पालख्या हडपसर गाडीतळापर्यंत एकत्रितपणे मार्गस्थ होतील.
हडपसर गाडीतळ येथून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गानी पुढे प्रवास करतील. यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड रस्त्याने दिवे घाटमार्गे रविवारी सायंकाळी सासवड येथे मुक्कामी पोहोचेल. तर श्री तुकाराम महाराज यांची पालखी पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर येथे मुक्कामी जाईल.
पालखी सोहळ्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते आणि वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती वाहतूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आपत्कालीन मदतीसाठी वाहतूक नियंत्रण कक्ष
संपर्क क्रमांक : ०२०-२६६८५००० किंवा २६६८४०००