पुण्यात बी.जी. सर फाउंडेशनचा शुभारंभ; विशेष मुलांच्या स्वावलंबनासाठी पुढाकार

पुण्यात बी.जी. सर फाउंडेशनचा शुभारंभ; विशेष मुलांच्या स्वावलंबनासाठी पुढाकार

पुणे | १ नोव्हेंबर २०२६ : विशेष गरजा असलेल्या मुलांमधील सुप्त गुण, क्षमता आणि कौशल्यांना योग्य दिशा देऊन त्यांना सन्मानपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘बी.जी. सर फाउंडेशन’ या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. रविवारी, १ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात बालकृष्ण गोपाळराव कुलकर्णी (बी.जी. सर) यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. ‘वेगळ्या क्षमता, अनंत शक्यता!’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही संस्था कार्य करणार आहे.

विशेष गरजा असलेल्या मुलांना केवळ सहानुभूती न देता त्यांच्या क्षमतांना योग्य संधी, उपचार, शिक्षण आणि प्रोत्साहन मिळावे, हा संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष क्षमता असते. त्या क्षमतांची ओळख करून त्यांचा विकास घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधार आवश्यक असल्याची भूमिका संस्थेने मांडली आहे.

फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी लवकर निदान, आवश्यक उपचार, विविध थेरपी, पुनर्वसन, सुलभ शिक्षण आणि सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर मुलांच्या पालकांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि कौटुंबिक आधार देण्यावरही भर दिला जाणार आहे.

विशेष गरजा असलेल्या मुलांबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, त्यांच्या क्षमतांचा स्वीकार करणे आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी जनजागृती करणे, हेही संस्थेच्या कार्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट असणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला ह.भ.प. यशोधन महाराज साखरे (साधक आश्रम, आळंदी), ज्ञानेश्वर तापकीर (संस्थापक, योगीराज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बाणेर), राजकिशोर मोदी (अध्यक्ष, अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक), गणेश शिरसाठ (संस्थापक, शिरसाठ अकादमी), सचिन बढे (पोलीस उपायुक्त, मोटार परिवहन, बृहन्मुंबई), राम लिपटे (उप धर्मादाय आयुक्त) आणि बालमेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अनुप वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती कुलकर्णी, उपाध्यक्षा सपना बढे, सचिव तथा बालरोग मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ बी. कुलकर्णी, खजिनदार दत्तात्रय गंगणे तसेच विश्वस्त आशिष पद्मने, दीपक सरगड आणि कविता सरगड यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनचे कार्य पुढे नेण्यात येणार आहे.

विशेष मुलांना त्यांच्या क्षमतांनुसार प्रगती करण्याची संधी मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होता यावे, यासाठी संस्था विविध उपक्रम राबविणार आहे.

‘Different Abilities, Infinite Possibilities’ अर्थात ‘वेगळ्या क्षमता, अनंत शक्यता!’ या संकल्पनेतून विशेष मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य मिळवण्याचा संस्थेचा मानस आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories