मदतीच्या बहाण्याने 'एटीएम' कार्ड बदलले ; ज्येष्ठ नागरिकाला 3 लाखांचा गंडा

मदतीच्या बहाण्याने 'एटीएम' कार्ड बदलले ; ज्येष्ठ नागरिकाला 3 लाखांचा गंडा

पिंपरी : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची घटना भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत संबंधित ज्येष्ठ नागरिकाचे तब्बल 3 लाख 62 हजार 298 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, 71 वर्षीय तक्रारदार रविंद्र पंडितराव कुलकर्णी हे इंद्रायणी नगर, भोसरी येथील युनियन बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर संबंधित व्यक्तीने तक्रारदाराच्या एटीएम व्यवहाराचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढली. तसेच एटीएम कार्डचा गैरवापर करून सोन्याची खरेदी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अज्ञात इसमाने तक्रारदार कुलकर्णी यांचा एटीएमचा पासवर्ड माहिती करून घेतला. त्यानंतर हातचालाखीने बँक खात्यातील रक्कम काढली. यानंतर त्याने खोटे बंद असलेले एटीएम कुलकर्णी यांना देत हातचालाखीने एटीएम बदलले.

तक्रारीनुसार, या फसवणुकीत एटीएम मधून1 लाख रुपये काढण्यात आले, तर 2 लाख 62 हजार 298 रुपयांची सोन्याची खरेदी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 3 लाख 62 हजार 298 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316(2) तसेच भारतीय दंड विधान कलम 406 अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लबडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories