म्हाडाच्या नावाखाली 1.44 लाखांची फसवणूक ; बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड

म्हाडाच्या नावाखाली 1.44 लाखांची फसवणूक ; बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड
पिंपरी-चिंचवड : म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची 1 लाख 44 हजार 158 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मोशी येथील रोशनी रेसिडेन्सी परिसरात उघडकीस आला आहे. म्हाडाचा अर्ज न भरता बनावट पावती दिल्याचा तसेच डोमासाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचे दाखले बनावट तयार करून दिल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या सुमारास मोशी येथील रोशनी रेसिडेन्सी, सेक्टर 6 येथे ही घटना घडली. तक्रारदार व्यंकट मारोती राठोड (वय 53, रा. मोशी) यांनी म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी आरोपी नितीन शहाजी वाघमारे (वय अंदाजे 35, रा. रावेत) याच्याकडे 1 लाख 44 हजार 158 रुपये दिले होते.

आरोपी नितीन वाघमारेने तक्रारदार व्यकंट यांचा विश्वास संपादन करून म्हाडाचा अर्ज भरून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात अर्ज न भरता म्हाडाच्या अर्जाची बनावट पावती तयार करून त्यांना दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

व्यकंट यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आकाश राठोड आणि मुलगी पूजा राठो यांच्या म्हाडाच्या अर्जासाठी आवश्यक असलेले डोमासाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचे दाखले पुणे शहर तहसील कार्यालयातून मिळवल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.  आरोपी नितीनने तक्रारदार व्यंकट यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी 21 नोव्हेंबर 2026 रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 933/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 336(3) तसेच भारतीय दंड विधानातील कलम 420 आणि 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories