खेडमध्ये भीषण अपघात! ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

खेडमध्ये भीषण अपघात! ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील शेलगाव परिसरात भीषण अपघात घडला आहे. ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 19 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर ते चाकण रस्त्यावरील शेलगाव येथील दत्तवाडी, सुवर्ण मसाले परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार अंकुश वामन गांडकर यांचा मृत्यू झाला असून लक्ष्मीबाई जालिंदर घेंगड या जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर अंकुश गांडकर यांचा मुलगा आकाश गांडकर याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

तक्रारीनुसार, आकाश गांडकर यांचे वडील अंकुश गांडकर हे आपल्या मावशी लक्ष्मीबाई घेंगड यांना वडगाव घेंगड येथे सोडण्यासाठी मोटारसायकल वरून चाकणच्या दिशेने जात होते. यावेळी एका ट्रॅक्टर चालकाने समोर येत असलेल्या दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. आरोपी ट्रॅक्टर चालक वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

यावेळी आरोपीच्या ट्रॅक्टरची अकुंश गांडकर यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. याचवेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने अंकुश गांडकर यांना गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर लक्ष्मीबाई घेंगड यांनाही गंभीर व किरकोळ दुखापत झाली असून मोटारसायकलचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी आकाश गांडकर यांनी 20 नोव्हेंबर 2026 रोजी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी ज्ञानेश्वर सोपानराव धनक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories