पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील तळवडे येथे पाणी सुरू करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका 34 वर्षीय तरुणाच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून, दगड फेकून मारल्याने त्याचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन मारुती वाळुंज (वय 34, रा. तळवडे) याने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सुदर्शन यांच्या मालकीच्या शेतजमिनीत 19 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शेतातील पाणी सुरू करण्याच्या कारणावरून आरोपी अमोल वाळुंज आणि प्रदीप वाळुंज (दोघेही रा. तळवडे) यांनी तक्रारदार सुदर्शन यांच्याशी वाद घातला. "आमचे दिवसभर पाणी असून तू पाण्याचा वॉल्व्ह का सुरू केला?" असे म्हणत दोघांनी शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
यावेळी आरोपी अमोलने बाजूला पडलेला दगड उचलून तक्रारदार सुदर्शन यांच्या दिशेने फेकून मारला. त्यामुळे सुदर्शन यांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटाला गंभीर दुखापत होऊन बोट फ्रॅक्चर झाले.
या प्रकरणी 21 नोव्हेंबर 2026 रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच भारतीय दंड विधानातील नमूद कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत.