पिंपरी-चिंचवड : शहरातील प्रयोगकलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी रंगानुभूति प्रयोगकला महोत्सवाचा विस्तार करण्याची गरज आहे. हा महोत्सव केवळ भारतातीलच नव्हे, तर आशियातील महत्त्वाचा प्रयोगकला महोत्सव म्हणून नावारूपाला यावा. पुढील वर्षापासून महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले. यावेळी आयुक्त सूर्यवंशी बोलत होते. 'कलाकार हा केवळ मनोरंजन करत नाही, तर माणूस घडवतो.' यामुळे हा महोस्तव पिंपरी-चिंचवड शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा ठरावा. प्रयोगकलांना प्रोत्साहन देत त्याची व्याप्ती आशिया स्तरापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असेही आयुक्त सूर्यवंशी यांनी नमूद केले.
यावेळी समर नखाते यांनीही महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. ‘पैस रंगमंच’च्या माध्यमातून कलाकारांना स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. शहरात दर्जेदार कलाकृती साकारल्या जात असून, कलेचा हा विस्तार असाच सुरू राहावा. यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सहकार्य करत आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाचा ‘रंगानुभूति कला सन्मान’ ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या कलेचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित, भारतीय चित्रपट विभागाचे माजी विभागप्रमुख समर नखाते, प्रभाकर पवार आणि अमृता ओंबळे उपस्थित होते.