पिंपरी : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या आणि इतर डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या निरोगी बालपणावर, शारीरिक विकासावर आणि मानसिकतेवर परिणाम होत आहे. मुलांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. हे लक्षात घेता मुलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काळभोरनगरमध्ये महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 14 मधील कै. शंकर शेट्टी उद्यानात आमदार स्थानिक विकास निधीतून बालकांसाठी नवीन खेळण्यांची सुविधा उभारण्यात आली आहे.
या सुविधेचा लोकार्पण सोहळा सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कै. शंकर शेट्टी उद्यान, काळभोरनगर, प्रभाग क्र. १४, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
उद्यानात नव्याने उपलब्ध झालेल्या खेळण्यांमुळे परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित आणि आनंददायी वातावरण मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक हालचालींसोबतच त्यांच्यातील सामाजिक संवाद आणि इतर कौशल्यांच्या विकासालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.
मुलांना घराबाहेर पडून मैदानी खेळ खेळता यावेत, यासाठी सार्वजनिक उद्यानांमध्ये आवश्यक सुविधा असणे महत्त्वाचे आहे. बालकांचे बालपण आनंदी आणि निरोगी राहावे, या उद्देशाने आमदार अमित गोरखे यांच्या स्थानिक विकास निधीतून हे काम करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामे करण्यावर आपला भर असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. "मुलांसाठी खेळण्यांच्या सुविधा निर्माण करणे ही केवळ मनोरंजनाची बाब नसून त्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. प्रत्येक परिसरातील नागरिकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी विकासकामे सातत्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे" त्यांनी स्पष्ट केले.
या लोकार्पण सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.