चाकण | १९ ऑक्टोबर २०२६ : खेड तालुक्यातील वासुली ते चाकण रस्त्यावर कंपनीच्या बसने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे बस चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास वराळे गावच्या हद्दीत, वासुली ते चाकण रस्त्यावर अॅव्हेन्यू कंपनीजवळ घडली.
या प्रकरणी सागर श्रीराम वराडे (वय २३ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.
अकाश राजेंद्र भालशंकर (रा. सिद्धार्थनगर, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या बसचालकाचे नाव आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादीचा चुलतभाऊ तुषार युवराज वराडे (वय २३ वर्षे) हा एमएच-१४ डीई-६२३ क्रमांकाच्या स्कूटीवरून वासुली फाटा ते चाकण बाजूकडे जात होता.
यावेळी चाकणकडून वासुलीकडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या एमएच-१४ एनई-७१५७ क्रमांकाच्या बसचालकाने बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवल्याचा आरोप आहे.
बसचालकाने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने तुषार गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अपघातात स्कूटीचे अंदाजे ७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचीही नोंद आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(ए)(बी), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.