चऱ्होली | १९ ऑक्टोबर २०२६ : चऱ्होली बुद्रुक येथील पठारेमळा परिसरात सोयाबीन काढणीच्या मशीनवरून झालेल्या वादातून ६३ वर्षीय शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शंकर गुलाब पठारे (वय ६३ वर्षे, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सत्यवान काळूराम पठारे (वय ३० वर्षे, रा. पठारेमळा, चऱ्होली बुद्रुक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चऱ्होली येथील सर्व्हे क्रमांक ३२८ मध्ये सोयाबीन काढणीची मशीन शेतामधून घेऊन गेल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपीने त्यांना अडवले. मशीन आपल्या शेतातून का नेण्यात आले, अशी विचारणा करत पुन्हा शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी आरोपीने जवळ पडलेला लाकडी दांडका उचलून फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या दंडावर, डाव्या पायाच्या घोट्यावर आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत फिर्यादीला दुखापत झाली.
तसेच आरोपीने पुन्हा भेटल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३४/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.