‘माणुसकीची दिवाळी’ : लातूर, धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत

‘माणुसकीची दिवाळी’ : लातूर, धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत

पिंपरी-चिंचवड | ५ नोव्हेंबर २०२६ : दिवाळीचा सण आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा असला, तरी दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ, मानवतावादी जनशक्ती आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘माणुसकीची दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मासुर्डी गावात तसेच धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचे किट, दिवाळीचा फराळ आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

या उपक्रमात मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश स्वामी, कामगार नेते तथा कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रमेश पिंपरे, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, उपाध्यक्ष राजेश माने, तसेच चंद्रकांत कुंभार, लाला राठोड, विशाल सरोदे, सुनील भोसले आणि समशुद्दीन शेख आदी सहभागी झाले होते.

यावेळी काशिनाथ नखाते यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ मदतवाटपापुरता मर्यादित नसून संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आधार देण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी एकटे नसून संपूर्ण कष्टकरी समाज त्यांच्या पाठीशी आहे, हा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे. केवळ सणासुदीच्या काळात मदत करण्याऐवजी संकटाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश स्वामी म्हणाले, "ज्या बळीराजाच्या कष्टातून आपल्या घरात अन्न येते, त्याच बळीराजाच्या घरात दिवाळीला अंधार असेल तर आपल्या आनंदाला काय अर्थ? शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ मदत नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे."

जात, धर्म, भाषा आणि पक्ष यापलीकडे जाऊन माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाणे हाच खरा मानवतेचा धर्म असल्याची भावनाही स्वामी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यामागे त्यांना मानसिक आधार देण्याचाही उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मदतीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी आपुलकीने स्वागत केले. तसेच त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्थाही केली. यावेळी पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या आनंदात सहभागी होत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories