पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
पुणे, ता. ६ जुलै २०२६ - राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये सोमवारी (ता. ६) आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा. खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम जे सवलत द्यावी. असे न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि किनारी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहेत. अपेक्षित उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहेत. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने 'एसडीआरएफ' आणि 'एनडीआरएफ' ची पथके रवाना करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
येत्या तीन दिवसांत, म्हणजे ८ जुलैच्या रात्रीपर्यंत, हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे. दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.