वारकऱ्यांनी देहू-आळंदीला न जाता पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
वारकऱ्यांनी देहू-आळंदीला न जाता पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
पुणे, ता. ६ जुलै २०२६ - श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक ७ व ८ जुलै रोजी देहू व आळंदी येथून होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वारकरी, भाविक व नागरिकांनी पालखी सोहळ्यात पुणे महानगरपालिका हद्दीपासून किंवा त्यापुढील ठिकाणांपासूनच सहभागी व्हावे, अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात दिनांक ६ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून देहू व आळंदी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे या परिसरातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. आळंदीमध्ये नदीवरचे पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "वारी सुरू होत आहे. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना विनंती आहे की, आळंदी आणि देहूमध्ये जाण्याचे टाळावे. पालख्या १० जुलैला पुण्यात पोहोचणार आहेत. वारकरी थेट पुण्यात यावेत. आळंदी-देहूला मोठ्या प्रमाणात जमा होऊ नये, कारण तिथे जाणे धोक्याचे आहे. पुण्यात येणे सोयीचे होईल आणि कोणत्याही दुर्घटनांना प्रतिबंध होईल.वारीसाठी सर्व व्यवस्था शासनाकडून केल्या गेल्या आहेत. जर्मन हँगर्स (टेंट्स) आणि इतर सुविधांच्या माध्यमातून वारकऱ्यांची राहण्याची आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.''