बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक, चौघांवर गुन्हा
Mar 21 2026
32
बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक, चौघांवर गुन्हा
पिंपरी, ता. २१ - पुनावळे येथील बांधकाम व्यावसायिकाची एका कुटुंबाने तब्बल २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सदर बांधकाम व्यावसायिक विकसत करत असलेल्या गृहप्रकल्पामध्ये आरोपीने तोडफोड करुन अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसानही केले आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवसाय बांधकाम व्यवसायिक सुधीर पांडुरंग वरेकर (वय ५१ वर्षे, व्यवसाय - बांधकाम व्यवसाय, रा. पुनावळे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अरुण विलास गायकवाड व त्याची पत्नी, विलास गायकवाड, विकी विलास गायकवाड (सर्व रा. जनता वसाहत, गोखलेनगर) यांच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबे येथील आरोपी गायकवाड यांची जागा त्यांनी फिर्यादी वरेकर यांना विकसनासाठी दिली होती. यामध्ये आरोपींनी फिर्यादी वरेकर यांचा विश्वास संपादन करुन जागा विकसन केल्यानंतर अॅग्रीमेंट करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली व वरेकर यांचा विश्वासघात करुन त्यांची एकूण २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवूणक केली आहे. हा प्रकार १ मे २०२३ पासून आत्तापर्यंत घडला आहे.
तसेच आरोपींनी १५ मे २०२५ रोजी जांबे (ता. मुळशी) येथील बांधकाम साईट ही विकसनासाठी वरेकर यांच्याकडे असताना त्याठिकाणी येऊन वरेकरांना दमदाटी केली व ८ फ्लॅट्सचे कुलूप तोडून, ते ताब्यात घेतले आहेत. बिल्डींग मधील सीसीटीव्ही कॅमरे तोडले, स्लायडींग विंन्डो दगड मारून फोडून नुकसान केले, लाईट मिटरच्या वायर तोडल्या, बोरवेलमध्ये विटा, दगड टाकून बोरवेल बंद केले, बिल्डींगमधील राहीलेले इलेक्टीक वायर मटेरियल सोबन नेले. यात आरोपींनी अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसान केले आहे व २ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणुक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.