बावधनमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार; ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बावधनमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार; ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : बावधनमधील जाधव वस्ती येथे घरगुती सिलिंडरमधून इतर सिलिंडरमध्ये अनधिकृतपणे गॅस भरल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुरेशा सुरक्षा उपायांशिवाय हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी सांयकाळी सात वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव वस्तीतील रिहान शाळेसमोर, कानिफनाथ मंदिराशेजारी वडाच्या झाडाखाली हा प्रकार सुरू होता.

एका बोलेरो पिकअप वाहनात आणि संबंधित ठिकाणी सिलिंडर व गॅस भरण्याची उपकरणे पोलिसांना आढळली. एकूण चार लाख २५ हजार ४०० रुपये किमतीच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सहा भरलेले घरगुती सिलिंडर, चार रिकामे घरगुती सिलिंडर, पाच लहान व्यावसायिक सिलिंडर, तीन रिफिलिंग नोझल आणि एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार, घरगुती वापराचा गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विकण्याचा कारभार सुरू होता. संबंधित व्यक्ती घरगुती भरलेल्या सिलिंडरमधून इतर सिलिंडरमध्ये गॅस काढताना आढळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ज्वलनशील पदार्थ हाताळताना आवश्यक सुरक्षिततेची व्यवस्था केली नव्हती, असेही तक्रारीत नमूद आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सागर पावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बावधन पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि इतर संबंधित कायद्यांनुसार या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शितलगिरी पुढील तपास करीत आहेत.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories