चिंचवड | १ ऑक्टोबर २०२६ : सणासुदीच्या काळात नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड येथील प्रदीप स्वीट्समध्ये तपासणी करण्यात आली. या कारवाईत १८ किलो फरसाण आणि ११६ किलो सॉल्टेड बटाटा वेफर्स असा एकूण १३४ किलो खाद्यसाठा ताब्यात घेण्यात आला.
तपासणीदरम्यान काही खाद्यपदार्थ निर्धारित गुणवत्तेच्या निकषांशी विसंगत असल्याचे आढळून आल्याचे एफडीएने म्हटले आहे. काही पदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्या, तर काही खाद्यपदार्थ असुरक्षित असल्याचे तपासणीत समोर आल्याने विक्रीसाठी ठेवलेला संबंधित साठा जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनाविरोधात पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय चट्टे यांनी सांगितले की, प्रदीप स्वीट्समध्ये केलेल्या तपासणीत आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारे खाद्यपदार्थ आढळले. संबंधित दुकानाला नोटीस बजावण्यात आली असून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने एफडीएच्या या तपासणी मोहिमेकडे व्यावसायिकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.