पिंपरी-चिंचवड : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरात सोन्याचे जुने दागिने देऊन त्याबदल्यात नवीन दागिने बनवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2024 ते 24 ऑगस्ट 2026 च्या कालावधीत मावळ तालुक्यातील मनसा ज्वेलर्स येथे हा प्रकार घडला. मनसा ज्वेलर्सचा मालक जयदेव रतन पोरे याच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. जयदेव पोरे हा मूळचा पश्चिम बंगालचा असून सध्या तळेगाव दाभाडे येथे वास्तवास आहे.
तक्रारीनुसार, जयदेवने महिला तक्रारदार आणि त्यांच्या गावातील इतर लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे जुने दागिने नवीन बवनून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने स्वत:कडे सुपूर्द करण्यास प्रवृत्त केले.
तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार, महिला आणि गावातील लोकांनी जवळपास ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडे दिले होते. मात्र, आरोपीने तक्रारदार महिला आणि गावातील लोकांचे जुने दागिने घेतल्यानंतर नवीन दागिने परत न करता पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्ष शेख याचा पुढील तपास सुरू आहे. भारतीय न्या संहिता कलम 316(2), 318(2),318(4) अन्वेय हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.