पिंपरी-चिंचवड : शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची लाखोंच्या आर्थिक फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. DELTA ALGO या ट्रेडिंग ॲपच्या माध्यामातून गुंतवणूकीस प्रवृत्त करून ही फसवणूक केल्याची तक्रार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2026 ते 19 नोव्हेंबर 2026 च्या कालावधीत हा प्रकार घडला. प्रवीण सोनावणे (वय 43) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनावने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना DELTA561 Unnati या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
त्यानंतर त्यांना DELTA ALGO नावाचे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवण्यात आली. त्यांनी अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये DEMAT खाते सुरू करून देण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे सोनावणे यांनी खात्यात पैसे पाठवले. ॲपमध्ये मोठा नफा झाल्याचे दिसल्याने त्यांनी पुढे काही काळ आणखी रक्कम त्यात गुंतवली.
मात्र, प्रत्यक्षात गुंतवलेली रक्कम आणि दाखवण्यात आलेला नफा परत मिळवताना अडचणी येऊ लागल्या. तसेच विड्रालचा पर्यायही बंद करण्यात आला होता. यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे सोनावणेंच्या लक्षात आले.
या प्रकरणी त्यांनी दिघी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार त्यांनी एकूण 31 लाख 6 हजार 950 रुपये गुंतवले होते. भारतीय न्याय संहिता कलम 318(4),316(2), 3(5) अन्वयेसह माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम कायदा 2008 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्ष मुसळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.