वाय.सी.एम. औषध प्रकरणाला नवे वळण ; छापेमारीच्या वृत्ताचे महापालिकेकडून खंडन

वाय.सी.एम. औषध प्रकरणाला नवे वळण ; छापेमारीच्या वृत्ताचे महापालिकेकडून खंडन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वाय.सी.एम.) औषधसाठ्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित औषधांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकला नसून, औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यानंतर महापालिकेनेच तपासणीसाठी एफडीएकडे धाव घेतल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तपासणी अहवालात औषधे निर्धारित निकषांनुसार नसल्याचे समोर आल्यानंतर संबंधित औषधांचा साठा एफडीएने ताब्यात घेतला. या प्रकरणात उत्पादक कंपनी आणि पुरवठादारावर तीन वर्षांची कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातून 14 फेब्रुवारी रोजी Cap. B-Complex with Zinc (CareZinc) या औषधाबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी महापालिकेने महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन, मोशी यांना पत्र पाठवून औषधांची तपासणी करण्याची विनंती केली. तपासणी पूर्ण होईपर्यंत महापालिकेने संबंधित औषधांचा वापर बंद करून त्याचा साठा वेगळा ठेवला. याच दिवशी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी औषधांचे नमुने घेतले. या औषधांचा पुरवठा पुण्यातील मे. श्रीविनायक फार्मा यांच्यामार्फत जेजुरी एमआयडीसीतील इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीने केला होता.

तपासणी झाल्यानंतर, 16 जुलै 2026 रोजी Cap. B-Complex with Zinc हे औषध ‘Not of Standard Quality’ म्हणजेच औषध निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे एफडीएच्या अहवालातून स्पष्ट झाले. या निष्कर्षानंतर महापालिकेने 8 सप्टेंबर रोजी उत्पादक कंपनीला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले. तसेच औषधांचा पुरवठा करणाऱ्या मे. श्रीविनायक फार्मा यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली.

दरम्यान, 27 जुलै 2026 रोजी एफडीएने या पुरवठादाराकडून आलेल्या 12 प्रकारच्या औषधांची तपासणी केली. त्यापैकी 11 औषधे गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे, तर दोन औषधे मानकांनुसार असल्याचे महापालिकेला कळविण्यात आले. पुढे 4 नोव्हेंबर रोजी एफडीएने संबंधित 11 प्रकारच्या औषधांचा संपूर्ण साठा ताब्यात घेतला.

या कारवाईतील औषधसाठ्याची किंमत 1 कोटी 72 लाख 75 हजार 126 रुपये नसून 11 लाख 95 हजार 863 रुपये असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात एफडीएने ताब्यात घेतलेल्या 11 प्रकारच्या औषधांची किंमत आणि वृत्तांमध्ये नमूद केलेली रक्कम यात मोठी तफावत असल्याचे प्रशासनाने सांगितले. महापालिकेने संबंधित पुरवठादाराला या औषधांसाठी कोणतेही पैसे दिलेले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापुढेही औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यास नियमानुसार तपासणी केली जात असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, “वाय.सी.एम. रुग्णालयात एफडीएची छापेमारी झालेली नाही. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार मिळाल्यानंतर महापालिकेने औषधांचा साठा तपासणीसाठी एफडीएकडे पाठविला होता. रुग्णांची सुरक्षितता आणि औषधांची गुणवत्ता पडताळणे हा या कार्यवाहीचा उद्देश होता. त्यामुळे छापेमारी करून औषधसाठा जप्त केल्याचे वृत्त योग्य नाही.”

तर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी, “औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यानंतर महापालिकेने तपासणीसाठी पुढाकार घेतला. एफडीएकडून छापा टाकण्यात आलेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उत्पादक आणि पुरवठादाराविरोधात नियमानुसार कारवाई झाली आहे. या प्रकरणात चुकीची माहिती न पसरवता वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे,” असे म्हटले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories