पुणे : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान काही कारणांमुळे मसुदा मतदार यादीत नाव न आलेल्या मतदारांना आता आता अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेकडून परिशिष्ट-ब आणि परिशिष्ट-क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे एसआयआर प्रक्रियेदरम्यान, घरी अनुपस्थित असलेले, कामानिमित्त परदेशात गेलेले किंवा पत्ता बदलल्यामुळे मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेले मतदार अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करू शकतात.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान प्रगणकांकडून गणना अर्जाचे वाटप करण्यात आले होते. यावेळी काही मतदार कामानिमित्त परदेशात होते किंवा दिलेल्या पत्त्यावर उपलब्ध नव्हते. अशा मतदारांना परिशिष्ट-ब भरून अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच, ज्या मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (एएसडीडी) या वर्गवारीत समाविष्ट झाल्यामुळे मसुदा मतदार यादीत आलेली नाहीत आणि जे मतदार जुन्या पत्त्यावर राहत नसून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, त्यांनी परिशिष्ट-क भरणे आवश्यक आहे.
निवडणूक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मतदारांनी पुण्यातील जुन्या मतदार यादीत नमूद असलेल्या पत्त्याच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून परिशिष्ट-क प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर हे परिशिष्ट स्थलांतरित झालेल्या नवीन ठिकाणी सादर करावे. यामुळे संबंधित मतदाराचे नाव नवीन ठिकाणच्या मतदार यादीत समाविष्ट होण्यास मदत होईल.
तसेच, या प्रक्रियेसाठी मतदारांनी नमुना क्रमांक ८ (Form 8) भरू नये, असे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला 'Book a Call with BLO' भेट द्यावी.
तसेच, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची (ASDD) यादी पुणे जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ASDD यादी पाहण्यासाठी- https://asddlist.pune.gov.in या संकेतस्थाला भेट द्यावी.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची ही संधी लक्षात घेऊन संबंधित मतदारांनी आपल्या परिस्थितीनुसार योग्य परिशिष्ट भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुणे जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.