पिंपरी-चिंचवड : भोसरीत धार्मिक कार्यक्रमाला बोलावले नसल्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री 11.30च्या सुमारास मोहननगर परिसरात ही घटना घडली. तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या राहत्या घरासमोर धार्मिक कार्यक्रम सुरू होता. यावेळी तिच्या ओळखीची महिला गिता गायकवाड आणि तिचे पती शिवदास गायकवाड हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आले.
गिता गायकवाड हिने 'मी तुझी गुरू असतानाही तू मला कार्यक्रमाला का बोलावले नाही?' असे म्हणत तक्रारदार महिलेला शिवीगाळ केला. तिला हाताने मारहाण केली. तर तिचे पती शिवदास गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेला लोखंडी स्टँडचा पाईप हातात घेऊन तक्रारदार महिला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या लोकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत तक्रारदार महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच तेथीलच एका होंडा सिटी कारच्या समोरील व उजव्या बाजूच्या काचा फोडून नुकसान करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सोहम सोनावणे नावाच्या व्यक्तीची ही कार आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गिता गायकवडा हिचा नवार शिवदास गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्या संहिता कलम 118(2),118(1),115(2), 352,251(2),324(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भोसरी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल दौंड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.