फुगेवाडीत संशयास्पद मृ्त्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत द्यावी, कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची मागणी
फुगेवाडीत संशयास्पद मृ्त्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत द्यावी, कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची मागणी
पिंपरी, ता. २९ - फुगेवाडीमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुमुळे झालेल्या संशयास्पद मृ्त्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी आणि पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेले अवैध पद्धतीने चाललेले सर्व प्रकारचे उद्योग पोलिसांनी तत्काळ नष्ट करावेत आणि जाहीर पत्रकार परिषदेत त्याची माहिती द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही बनसोडे यांनी दिला आहे.
बनसोडे यांनी शुक्रवारी (ता. २९) फुगेवाडी येथे मृत्यू झालेल्या नागरीकांच्या कुटुंबियांची व परिसरातील नागरीकांची भेट घेतली. दापोडी पोलिस स्टेशनमधूनही त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी बोलताना बनसोडे म्हणाले, "मृत्युमुखी पडलेले नागरिक मजूर किंवा युवक यांची संख्या जवळपास 30 असल्याचे समजते मात्र हा आकडा पोलिसांकडून लपवला जात आहे असा संशय आम्हाला आहे, वास्तविक पाहता मृतांमध्ये संजयनगर, कुष्ठरोग्यांची वसाहत आणि झोपडपट्टी, आझाद चौक परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. सर्वजण चारशे मीटरच्या परिघात राहणारे आहेत. पोलिस स्टेशन पासून काही मीटर अंतरावर अशा पद्धतीचा दारूचा गुत्ता खुल्या पद्धतीने गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असल्याचे समजते, हा प्रकार म्हणजे सरळ सरळ पोलिसांशी हात मिळवणी करुन दारुचे साम्राज्य थाटणाऱ्या नफेखोरांचा व्यावसायिकांचा छुपा करार असल्याचे दिसून येते. याचा विशेष यंत्रणांद्वारे सखोल तपास करत याबाबत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.''
''पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटनांमुळे समाजविघातक प्रवृत्ती सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे याला रोखण्यासाठी पोलीस बळ हे असमर्थ ठरत आहे, एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहर हे काळ्याधंदांचा, गुन्हेगारीचा, पोलिसी भ्रष्टाचाराचा, सामान्य नागरिक शोषणाचा, अवैध धंद्यांचा अड्डा बनले आहे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून आमची मागणी आहे की या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवा. मुख्यमंत्र्यांना इतर मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये गाजावाजा करून नागरिकांना सांगता येतील अशा बाबींमध्ये मोठा रस असल्यासारखा दिसून येत आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करताना दिसतात मात्र गुन्हेगारांना रोखण्यासंदर्भात त्यांची भूमिका काय ही स्पष्ट दिसत नाही. अल्पवयीन मुलींवर मुलांवर झालेले अत्याचार असो नवविवाहितांवर झालेल्या अत्याचार असोत हुंडाबळी असोत अशा अनेक घटना या गोष्टीचा साक्ष आहेत. पॉक्सो न्यायालयाला मंजुरी मिळूनही महाराष्ट्र मध्ये ती उभी केली का गेली नाहीत? राज्यातील गुन्ह्यांचं ऑडिट आजपर्यंत मागील काही वर्षांपासून का केले गेले नाही? नागरिकांना खरे आकडे का सांगितले जात नाहीत? या सर्वांचा आपल्या लोकप्रियतेवर परिणाम होईल म्हणून स्वतःची लोकप्रियता वाचवण्यासाठी नागरिकांना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळ सर्रास सुरू ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुरु आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही.'', अशी टिका बनसोडे यांनी केली.