गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित लेझर-बिम लाइटचा वापर; मंडळाच्या अध्यक्षाला न्यायालयाकडून शिक्षा

गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित लेझर-बिम लाइटचा वापर; मंडळाच्या अध्यक्षाला न्यायालयाकडून शिक्षा

सांगवी | 4 सप्टेंबर 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून प्रखर बिम लाइट आणि लेझर बिम लाइटचा वापर केल्याप्रकरणी जय भवानी मित्र मंडळाच्या अध्यक्षाला न्यायालयाने 1 हजार रुपये दंड आणि न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 2 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये प्रखर बिम तसेच लेझर बिम लाइटच्या वापरावर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता. अशा प्रकाशयंत्रणेमुळे नागरिकांच्या डोळ्यांना आणि आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.

या आदेशाबाबत सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांची बैठक घेऊन तोंडी तसेच लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8:30 ते 11:45 या वेळेत गणेश नगर चौक ते पिंपळे निलख मुख्य बसस्थानकादरम्यान काढण्यात आलेल्या जय भवानी मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना इजा होऊ शकणाऱ्या प्रखर बिम आणि लेझर बिम लाइटचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष बजरंग विनायक लकडे (वय 34, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख) यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 343/2025 नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये 6 सप्टेंबर 2025 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरोधात दोषारोपपत्र क्रमांक 159/2025 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले. उपलब्ध पुरावे आणि दोषारोपपत्राच्या आधारे न्यायालयाने 3 सप्टेंबर 2026 रोजी 1 हजार रुपये दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली.

दरम्यान, 2026 च्या गणेशोत्सवात कोणत्याही मंडळाने नागरिकांच्या डोळ्यांना अथवा आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या प्रकाशयंत्रणेचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पूर्वसूचना न देता कठोर कारवाई करून संबंधित प्रकाशयंत्रणा जप्त केली जाईल. या कारवाईसाठी मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories