हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटणार? जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निर्देश

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटणार? जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निर्देश

पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बैठकीत हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

परिसरातील रस्ते विकासासाठी सुमारे 450 कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे तांत्रिक सादरीकरण पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि तांत्रिक प्रक्रिया अंतिम करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

रस्ते विकासकामांच्या निविदा 25 नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करून 20 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे अलाइनमेंट, भूसंपादन, टीडीआर आणि डीपीआरसंदर्भातील प्रलंबित अडचणी तातडीने सोडविण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच रिंगरोडच्या कामाला प्राधान्य देऊन मोजणी प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यास सांगण्यात आले.

हिंजवडी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रियेच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे, सांडपाण्याचा ओव्हरफ्लो रोखणे आणि पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले. मुळशी धरण आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून परिसरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.

परिसरात उघड्यावर कचरा जाळणे तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाले आणि नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा बजावून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. कचरा टाकण्याची ठिकाणे आणि प्रदूषणाची संभाव्य ठिकाणे निश्चित करून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासही सांगण्यात आले.

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पुढील बैठकीपूर्वी सर्व विभागांनी प्रलंबित अहवाल, निविदांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष सुरू झालेल्या कामांचा तपशील सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील नागरिकांनीही सहभाग घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories