पिंपरी : म्हैसूरचे शूर आणि पराक्रमी शासक, ब्रिटिश सत्तेविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी चौक येथील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, तारिक रिझवी, नबीलला मुल्ला, ज्ञानेश बोराटे, सुधाकर इंगळे,हरीश डोळस, सार्थक बाराथे, देवदत्त रानवडे, शाही ओव्हाळ, समीर शेख, इस्माईल शेख यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी टिपू सुलतान यांच्या शौर्य, स्वाभिमान, देशप्रेम आणि ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी बोलाताना नरेंद्र बनसोडे म्हणाले, "इतिहासाचा उपयोग समाज जोडण्यासाठी झाला पाहिजे, समाज तोडण्यासाठी नाही, तलवारीने लढलेल्या इतिहासा एवढाच विचारांनी घडवलेला भविष्यकाळ अधिक सामर्थ्यवान असतो. देशाची एकता ही कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसून प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आपल्याला द्वेषाचे राजकारण नको, तर शिक्षणाचे, रोजगाराचे आणि सामाजिक न्यायाचे राजकारण हवे."
महापुरुषांची जयंती केवळ हार-फुले वाहण्यासाठी नसते, तर त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प करण्यासाठी असते. त्यांच्या जीवनकार्याचा आणि संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केली.