पिंपरी-चिंचवड : रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर वाहनचालकांमधील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच मारहाण करण्यात आल्याची घटना म्हाळुंगे येथे घडली. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (22 नोव्हेंबर) रात्री 11.45 च्या सुमारास ॲव्हान व्हिस्टा सोसायटीसमोरील मुंबई लेनवर ही घटना घडली. तक्रारदार म्हाळुंगे परिसरातून पायी जात असताना त्यांना तीन वाहनांचा अपघात झाल्याचे दिसले. त्यामुळे ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेले. यावेळी इंडिका आणि स्कोडा कारचालकांमध्ये नुकसानभरपाई देण्यावरून वाद सुरू होता.
या दोन्ही वाहनचालकांमध्ये मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न तक्रारदाराने केला. मात्र, स्कोडा कारचालकाने त्यांना तू कोण आहेस, तू मध्ये का पडतोस, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात संबंधित चालकाने तक्रारदाराला हाताने आणि स्टीलच्या कड्याने डाव्या डोळ्याच्या वरील कपाळावर मारहाण करून जखमी केले.
या घटनेनंतर तक्रारदाराने बावधन पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारदार आशिष रामेश्वर तांगडे (वय २९ वर्षे, रा. थेरगाव) यांनी लाल रंगाच्या स्कोडा कारवरील चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, बावधन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक फड पुढील तपास करत आहेत.