उपमुख्यमंत्र्यांकडून PCMC विकासकामांचा आढावा; शहरातील समस्यांवर महत्वपूर्ण निर्देश

उपमुख्यमंत्र्यांकडून PCMC विकासकामांचा आढावा; शहरातील समस्यांवर महत्वपूर्ण निर्देश

पिंपरी : दिवंगत अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. शहराच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सुनेत्रा पवार यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठा, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक आणि औद्योगिक विकासासह सुमारे १९ विविध क्षेत्रांतील कामांचे सादरीकरण केले.

शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि गृहनिर्माण सोसायट्यांचे टँकरवरील अवलंबित्व याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे इतर भागांतून होणारे संभाव्य स्थलांतर लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मोशी कचरा डेपोतील दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेला यश मिळाले असले, तरी कचरा व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पवना आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन, हवेचे प्रदूषण, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे या समस्यांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासह कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावरही त्यांनी भर दिला. सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड रोड प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘श्रीमंत महानगरपालिका’ ही ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाच्या स्तरावरील प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. अजित पवार यांनी पाहिलेले शहराच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories