पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना-2027 ची तयारी सुरू ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना-2027 ची तयारी सुरू ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पिंपरी-चिंचवड : देशाच्या आगामी विकासाचे नियोजन आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना-2027 साठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर 25 जानेवारीपासून ते 28 फेब्रुवारी 2027पर्यंत प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत.

जनगणना-2027 च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यस्तरीय बैठक पार पडली.  महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी विजय सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी जणगणेच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजन, स्वगणना प्रक्रिया आणि जनजागृतीच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जनगणना-2027 मध्ये नागरिकांना डिजिटल माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी 10 ते 24 जानेवारी 2027 दरम्यान se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरता येईल. यापूर्वी लॉगिन न केलेल्या नागरिकांनाही नव्याने लॉगिन करून नोंदणी करता येणार आहे.

स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना 'P' अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक (SE ID) मिळेल. हा क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रगणक प्रत्यक्ष घरी आल्यानंतर त्यांना हा क्रमांक दाखवता येईल. त्यामुळे माहितीची पडताळणी करणे सोपे होणार असून नागरिकांचा वेळही वाचणार आहे.

डिजिटल स्वगणनेनंतर 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष गृहभेटी देऊन लोकसंख्येची माहिती गोळा करतील. त्यानंतर 1 ते 5 मार्च 2027 या कालावधीत पुनरीक्षण फेरी होणार आहे. नागरिकांनी स्वगणनेच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि प्रत्यक्ष गणनेवेळी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जनगणनेदरम्यान नागरिकांकडून संकलित होणारी वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती जनगणना कायदा, 1648 नुसार गोपनीय ठेवली जाणार आहे. या माहितीचा वापर जनगणनेच्या निर्धारित उद्देशांव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी केला जाणार नाही. तसेच जनगणनेच्या नावाखाली कोणाकडूनही ओटीपी, पिन किंवा अनावश्यक कागदपत्रे मागितली जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांचाच वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बैठकीदरम्यान, आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण आधार आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती नोंदविली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना योग्य व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे. जनगणना-2027 ही सामूहिक जबाबदारी समजून प्रत्येकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा."

तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी "पिंपरी चिंचवड शहरातील जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज होत आहे. स्वगणनेच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या माहिती नोंदविण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी स्वगणना पूर्ण केल्यानंतर प्राप्त होणारा 11 अंकी SE ID जतन करून ठेवावा आणि प्रत्यक्ष गणनेच्या वेळी प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा. प्रशासनाला सहकार्य करून जनगणनेचे हे राष्ट्रीय कर्तव्य यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा." असे सांगितले.

तर उपआयुक्त सचिन पवार म्हणाले, "जनगणना-2027 ची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक पूर्वतयारी आणि समन्वय साधण्यात येत आहे. नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत स्वतःहून सहभाग घ्यावा. प्रगणक गृहभेटीसाठी आल्यानंतर त्यांना संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची माहिती देऊ नये. नागरिकांच्या सहकार्यामुळे जनगणनेची प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होईल."

जनगणनेविषयी अधिक माहितीसाठी नागरिक www.censusindia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. स्वगणनेसाठी se.census.gov.in हे पोर्टल उपलब्ध असून 1855 या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories