पिंपरी-चिंचवड : तळेगाव दाभाडेत महिनाभरापूर्वी झालेल्या वादातून एका 36 वर्षीय व्यक्तीला कोयता आणि काठीने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दोनजणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश अरुण भांमरे (वय ३६ वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीवरून सिद्धेश भगवान साळुंके (वय २३ वर्षे, रा. सडवली) आणि संदीप बाळू चव्हाण (वय २६ वर्षे, रा. भडुरवाडी ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, रविवारी (22 नोव्हेंबर) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास योगेश भांबरे हे सोमाटणे फाटा येथील टाटा हाऊसिंग सोसायटीमधील घरातून मुलासाठी खरवस घेऊन येतो, असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, ते पुन्हा घरी परतले नाहीत.
सिद्धेश साळुंके याने खरवस देण्याच्या बहाण्याने योगेश यांना उर्से येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना बुलेटवरून ओझर्डे गावच्या शिवारात नेले. तेथे संदीप चव्हाण याच्या मदतीने महिनाभरापूर्वी झालेल्या वादातून योगेश यांच्या डोक्यात कोयत्याने तसेच काठीने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शिरगाव-परंदवडी पोलिसांकडून संबंधित अहवाल, वैद्यकीय कागदपत्रे आणि पंचनामे प्राप्त झाल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी यापूर्वी दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे. भारतीय न्याय संहिता कलम 138, 140 (3) आणि कलम वाढ 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वाघुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.