पिंपरी : रहाटणी-काळेवाडी परिसरातील रखडलेल्या रस्त्यांच्या विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील आरक्षित रस्त्यांच्या तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जागा महापालिकेने तातडीने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्यांच्या आरक्षणाचा मोबदला घेऊनही काही जमीनमालकांनी रस्त्यांच्या जागा अडवून ठेवल्या आहेत. तसेच सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागाही महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या नाहीत, असे तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असून, काळेवाडीतून पिंपरीकडे जाण्यासाठी वळसा मारावा लागत आहे.
तापकीर मळा ते पिंपरीगाव पूल, लक्की बेकरी ते पिंपरीगाव आणि राजवाडेनगर ते पिंपरी पूल या मार्गांवरील रस्त्यांचा विकास करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. या मार्गांचा विकास झाल्यास पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना एम्पायर इस्टेट पुलाकडे जाणे अधिक सोयीचे होईल. तसेच रहाटणी-काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांचा विकास केल्यास नागरिकांच्या वाहतुकीच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल.
परिसरातील १२ मीटर, ९ मीटर आणि ६ मीटर रुंदीच्या आरक्षित रस्त्यांच्या जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात. रस्त्यांच्या विकासामुळे बाधित होणाऱ्या जमीनमालकांना जमिनीच्या प्रचलित बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही तापकीर यांनी केली आहे.
वाकड, रावेत, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या भागांप्रमाणे रहाटणी-काळेवाडी परिसरातील रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांचा त्रास कमी होण्यासोबतच परिसरातील जमिनींचे मूल्य वाढण्यास आणि परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागा महापालिकेच्या ताब्यात न आल्याने रहाटणी-काळेवाडी परिसर बकाल होत चालल्याचेही तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नागरिकांना चांगले रस्ते आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रहाटणी-काळेवाडीतील रस्त्यांची आरक्षणे आणि सार्वजनिक हितासाठी आरक्षित जागा तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.