पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच संविधान सन्मान दौड ; हजारो नागरिक होणार सहभागी

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच संविधान सन्मान दौड ; हजारो नागरिक होणार सहभागी

पिंपरी-चिंचवड : भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि युवा पिढीमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता ही दौड सुरू होणार असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली.

आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच यापुढे दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

संविधान सन्मान दौड चिंचवड येथील क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौकातून सुरू होणार आहे. तेथून पिंपरीतील भीमसृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दौडीचा समारोप होणार आहे. समारोपप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

साधारण दीड किलोमीटर अंतराच्या या दौडीत महापालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, उद्योजक, डॉक्टर, अभियंते, वकील, पत्रकार, शिक्षक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, क्रीडा संघटना आणि नागरिक सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आयोजकांकडून सहभाग प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.

दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. या निमित्ताने संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती देण्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाबाबत महापौर रवि लांडगे म्हणाले की, लोकशाही मूल्यांचा जागर, संविधानाप्रती आदर आणि सामाजिक समतेचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही दौड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिक, विद्यार्थी आणि युवकांच्या सहभागातून संविधान दिन व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

ही दौड केवळ क्रीडा उपक्रम नसून संविधानाचा सन्मान, लोकशाहीवरील विश्वास आणि नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता चिंचवड येथील क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories