पुणे मेट्रो लाईन 3 ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद ; रोज हजारो प्रवाशांचा प्रवास!

पुणे मेट्रो लाईन 3 ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद ; रोज हजारो प्रवाशांचा प्रवास!

पुणे : हिंजवडी आयटी पार्क आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन 3 ला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपासून या मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास 50 हजारांच्या घरात पोहोचली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) स्थानकांवरील सुविधांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

या मार्गावरील जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत आहे. विशेषतः जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसविण्यात आले आहेत. प्रवाशांना स्थानकांमध्ये ये-जा करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या लाईन 3 वर 20 मेट्रो गाड्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 300 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होत आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून सुमारे 99 टक्के गाड्या वेळेवर धावत असल्याची माहिती पीआयटीसीएमआरएलने दिली आहे.

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी सांगितले की, "मेट्रोमुळे नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनही मेट्रोला पसंती मिळत आहे. त्याचबरोबर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे."

दरम्यान, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. ही स्थानके कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित स्थानकांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, कामाचा दर्जा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सैनी यांनी स्पष्ट केले.

माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर यांना जोडणारा पुणे मेट्रो लाईन 3 हा 23.3 किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावरील 17 स्थानके सध्या प्रवाशांसाठी खुली आहेत.

या मेट्रो सेवेमुळे हिंजवडी आयटी पार्कचा पुण्यातील निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक परिसरांशी संपर्क अधिक सुलभ झाला आहे. दैनंदिन प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला पर्याय उपलब्ध झाला असून, वाढती प्रवासी संख्या पाहता मेट्रो सेवेला नागरिकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories