पिंपरी-चिंचवडच्या विकासावर होणार अभ्यास ; TISS च्या विद्यार्थ्यांचा महापौरांशी संवाद

पिंपरी-चिंचवडच्या विकासावर होणार अभ्यास ; TISS च्या विद्यार्थ्यांचा महापौरांशी संवाद

पिंपरी : औद्योगिक नगरीपासून विकसित शहरापर्यंतचा पिंपरी-चिंचवडचा प्रवास आता संशोधनाचा विषय ठरणार आहे. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे (TISS) संशोधक विद्यार्थी पुढील दहा दिवस शहरातील विविध विभागांना भेटी देणार आहेत. या अभ्यास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विद्यार्थ्यांनी महापौर रवि लांडगे यांची भेट घेत शहराच्या विकासाची दिशा आणि प्रशासनासमोरील आव्हाने जाणून घेतली.

यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना गेल्या काही दशकांत पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या लोकसंख्यावाढीची माहिती दिली. १९७० च्या दशकात सुमारे शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजार होती. ही लोकसंख्या २००१ मध्ये १० लाखांवर पोहोचली. २०११ च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या सुमारे १७ लाख होती, तर सध्या शहराची अंदाजित लोकसंख्या ३६ लाखांच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगांचा विस्तार आणि रोजगाराच्या उपलब्ध संधींमुळे शहरातील नागरीकरणाला वेग मिळत आहे. परिणामी, पाणीपुरवठा, रस्ते, जलवाहिन्या, मलनिस्सारण यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधांची मागणी वाढली आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने नियोजन केले जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

औद्योगिक शहर ते गार्डन सिटी अशी झालेली वाटचाल, स्वच्छतेच्या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार, उद्योगांचे शहराच्या विकासातील योगदान आणि नागरिकांच्या बदलत्या अपेक्षा यांचाही संवादात समावेश होता. घनकचरा प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांवरील वाढता ताण याबाबतही चर्चा झाली.

संशोधन करताना केवळ आकडेवारीवर अवलंबून न राहता शहराची जडणघडण, नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा, प्रशासकीय अडचणी आणि विकासाच्या भविष्यातील संधी समजून घेण्यावर भर द्यावा, अशी सूचना महापौरांनी विद्यार्थ्यांना केली. क्षेत्रभेटींमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि सूचना मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनातून समोर येणाऱ्या सूचना शहराच्या आगामी विकासासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी अशा अभ्यास दौऱ्यांचे विशेष महत्त्व आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद आणि क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थ्यांना शहरी व्यवस्थापन अधिक व्यापकपणे समजून घेता येईल, असे मत शिक्षण समिती सभापती रविना सागर आंगोळकर यांनी व्यक्त केले.

या संवादप्रसंगी शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, उपायुक्त अण्णा बोदडे आणि सीएसआर कक्षाचे विजय वावरे उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories