सातासमुद्रापार साकारलं ‘रामराज्य’; कलाकारांचा उपमहापौरांकडून विशेष सन्मान

सातासमुद्रापार साकारलं ‘रामराज्य’; कलाकारांचा उपमहापौरांकडून विशेष सन्मान

पिंपरी : सोमवारी (23 नोव्हेंबर) भारतीय संस्कृती, परंपरा आणि प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचे दर्शन घडविणाऱ्या ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. नृत्यकला मंदिर, पुणे  यांच्या निर्मितीतून साकारलेल्या या पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील २० कलाकारांनी सहभाग घेतला होता.

या भव्य नृत्यनाटिकेचा प्रीमियर २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर इंडोनेशियातील बाली येथील गरुडा विष्णू केंचना (GWK) कल्चरल पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. ‘असत्यावर सत्याचा विजय’ हा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला. वाल्मिकी रामायणातील विविध प्रसंग, प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र आणि भारतीय संस्कृतीतील मूल्ये नृत्य, अभिनय आणि संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली.

या नृत्यनाटिकेची संकल्पना, दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन तेजश्री अडिगे यांनी केले. भारतीय सांस्कृतिक परंपरा जागतिक व्यासपीठावर सादर करण्यासाठी सर्व कलाकारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

नृत्यनाटिकेत स्वरा सनानसे (श्रीराम), ऋध्वी शिंदे (सीता), तेजश्री अडिगे (रावण), जिवेन गुजराथी (दशरथ), प्रियांका सनानसे (कौसल्या), तेजस्विनी इनामदार (कैकयी), आराध्या इनामदार (भरत), इरा देशमुख (लक्ष्मण), क्षोनिका गोराणे (हनुमान), अश्विनी मुकादम (शबरी), नितीन सनानसे (विश्वामित्र) आणि सुप्रिया कुलकर्णी (सुमित्रा) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. इतर कलाकारांनीही नृत्यनाटिकेच्या सादरीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय संस्कृती आणि प्रभू श्रीरामांचे आदर्श सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या कालाकारांच्या या कलात्मक कामगिरीची दखल घेत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी कलाकारांचे कौतुक करताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय संस्कृती आणि प्रभू श्रीरामांचे आदर्श सादर केले, ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या शहरात अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना अधिकाधिक संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू."

शहरातील गुणी कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या पुढील वाटचालीला प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories