बारावीचा राज्याचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाच्याही निकालात कन्या आघाडीवर, पुणे विभागाचा निकाल ९१.२५ टक्के
बारावीचा राज्याचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाच्याही निकालात कन्या आघाडीवर, पुणे विभागाचा निकाल ९१.२५ टक्के
पुणे, ता. २ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, शनिवारी (ता. २) बारावीच्या परीक्षेचा निकाल पत्रकार परिषेदत जाहीर केला. यंदाचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये बारावीची परीक्षा झाली. यंदा राज्यभरातून १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालात कन्याच आघाडीवर आहेत.
यंदा, राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांच्या १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९४.१४ टक्के लागला आहे आणि सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८४.१४ टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.१५ टक्के असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ५९ हजार ८७६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हजार ३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार ३४९ विद्यार्थी (३६.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर, खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील २९ हजार ६३४ विद्यार्थी (८०.२१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात आठ हजार ३६७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील सात हजार ५७९ (१०.५८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला दिली. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सचिव डॉ. दीपक माळी यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी ३ ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी अशी -
- पुणे - ९१.२५
- नागपूर - ८८.६७
- छत्रपती संभाजीनगर - ८८.६८
- कोल्हापूर - ८९.९७
- अमरावती - ९०.९२
- नाशिक - ९०.७२
- लातूर - ८४.१४
- कोकण - ९४.१४
- मुंबई - ९०.०८