news
clock

महाराष्ट्रात लवकरच प्राध्यापक भरती होणार, ५ हजारांहून अधिक पदे भरली जाणार 

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा  

पिंपरी, ता. १० - ''महाराष्ट्रात लवकरच ५,००० हून अधिक प्राध्यापकांसाठी एक मोठी भरती प्रक्रिया  राबविली जाईल. संपूर्ण भरती प्रक्रिया जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळतील.'', अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत नुकतीच केली आहे. 

काँग्रेस सदस्य अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''महाराष्ट्रात ३१ हजार १८५ मंजूर प्राध्यापक पदे आहेत. त्यापैकी १९ हजार २६७ पदे भरण्यात आली आहेत. ११ हजार ९१८ रिक्त प्राध्यापक पदांपैकी ५ हजार १२ पदे भरतीसाठी मंजूर करण्यात आली आहेत, ४९४ पदे रिक्त आहेत. म्हणून ५ हजारहून अधिक पदांसाठी भरतीला मान्यता देण्यात आली आहे.''

''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला औपचारिक मान्यता दिली आहे. राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये रिक्त पदांमुळे शैक्षणिक कामात व्यत्यय येत असल्याने सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळतील. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची संख्या प्रमाणित झाल्यानंतर पदांचे पुनर्वितरण केले जाईल. महाविद्यालयांनी त्यांची यादी पूर्ण केल्यानंतर आणि एनओसी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु होईल. जूनपर्यंत प्राध्यापक भरती पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.'' असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी सध्याचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे आणि ते ६२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. विद्यार्थी संख्येवर आधारित एक नवीन चौकट विकसित केली जात आहे. राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये प्रलंबित भरती प्रक्रिया तसेच प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित समस्या लवकरच सोडवल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories