क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २३ जुलै २०२६
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🟠 नेरे येथे बांधकाम मजुराचा विहिरीत मृतदेह; खुनाचा गुन्हा दाखल
मुळशी तालुक्यातील नेरे येथे एका बांधकाम मजुराचा हात-पाय व कमरेला वायरने बांधलेला मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन पात्रा (वय अंदाजे २२ वर्षे, मूळ रा. सिमुलताला, नादिया, पश्चिम बंगाल) हा नेरे येथील सर्व्हे क्रमांक ६३ मधील बांधकाम साईटवर राहत होता. २२ जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी मेमाणे वस्ती, सर्व्हे क्रमांक ६१, नेरे येथील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून सुमन पात्रा याच्या डोक्यावर, डाव्या कानाच्या वर व कपाळावर मारहाण केली. त्यानंतर त्याचे हात-पाय व कमरेला वायर बांधून त्याला विहिरीत टाकून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी रामदास पांडुरंग मेमाणे (वय ६३, रा. आयआयएमएस कॉलेजसमोर, नेरे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संतू ऊर्फ विशाल बासूदेव मांजी (वय २२, रा. चुर्णीपोता, प्राथमिक शाळेजवळ, थाना कोतवाली, बिष्णुपूर, जि. नादिया, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🟠 मंगरुळ रोडवर ट्रेलर पलटी; चालक जखमी, वाहनाचे नुकसान
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नवलाख उव्रते-मंगरुळ रोडवरील सीकोम सेल्स अँड इंजिनिअरिंग कंपनीजवळ ट्रेलर भरधाव वेगात चालवून नेत असताना पलटी झाल्याची घटना २२ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई बापूराव ज्ञानदेव परभाने (वय ४६, नेमणूक तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन सुभाषराव गवळी (वय ४२, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. चिकुर्डी, ता. जि. लातूर) हा ट्रेलर क्रमांक एमएच-०६-ए-२०४८ चालवत होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगयीने वाहन चालविल्याने ट्रेलर पलटी झाला.
अपघातात ट्रेलरच्या समोरील केबिनचा भाग तुटून व चेपून नुकसान झाले तसेच समोरील काच फुटली. वाहनातील मागील बाजूस ठेवलेल्या दोन लोखंडी कॉईल खाली पडल्याने त्यांचेही नुकसान झाले. अपघातात चालकाच्या डाव्या मनगटाजवळ, कपाळाच्या उजव्या बाजूस आणि उजव्या पायाला मुका मार लागला असून तो किरकोळ जखमी झाला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🟠 पिंपळे गुरवमध्ये पार्किंगमधून होंडा युनिकॉर्न चोरी
पिंपळे गुरव येथील सुवर्णयुग कॉलनी परिसरात इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत खेमा वडेकर (वय ३८, रा. सुवर्णयुग कॉलनी, जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी त्यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (मॉडेल २०२०) दुचाकी इमारतीसमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. २० जुलै रोजी रात्री आठ वाजल्यापासून २१ जुलै रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.
चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून तिचा नोंदणी क्रमांक एमएच १४ जेडी २४३४ असा आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🟠 महाळुंगे येथील बांधकाम साईटवरून १.०५ लाखांच्या अॅल्युमिनियम तारा चोरी
व्ही.टी.पी. ग्रुपच्या महाळुंगे (ता. मुळशी) येथील बांधकाम साईटवरील स्टोअररूममधून १ लाख ५ हजार ६०० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी १२ जून २०२६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास महाळुंगे येथील व्ही.टी.पी. ग्रुपच्या बिल्डिंग साईटवरील स्टोअररूममधून झाली. स्टोअररूमचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपीने तेथून सुमारे ११० किलो अॅल्युमिनियमच्या तारा परवानगीशिवाय चोरून नेल्या.
याप्रकरणी साईटचे व्यवस्थापन पाहणारे रविंद्र वाघु तुपे (वय ५०, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अतुल शंकर शिंगाडे (वय ३३, रा. तळवडे, पुणे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये तसेच भारतीय दंड विधान कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा संबंधित साईटवरील कामगार इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🟠 सायबर फसवणुकीत बँक खाते वापरून ११ लाखांचा अपहार; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी बँक खाते उपलब्ध करून देत ११ लाख रुपयांची रक्कम वळती केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी UCO बँक खातेधारक पेन्नी हेन्री पॉवेल व तिच्या साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई श्रीकांत सुनील कबुले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने UCO बँकेतील खाते क्रमांक १९७००२१०००५२३१ हे खाते उघडून ते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी साथीदारांना वापरण्यास दिले. आरोपींनी संगनमत करून संघटित सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून तक्रारदारांची फसवणूक केली.
तपासात तीन तक्रारींमधील एकूण ११ लाख रुपयांची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा झाल्याचे आणि ती चेकद्वारे काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हा गुन्हा २४ सप्टेंबर २०२५ रोजी घडल्याचे नमूद असून, २२ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२), ३(५) तसेच भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------