जीआयएस प्रणाली नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी 'पीएमआरडीए'ची बैठक
पिंपरी, ता. २३ जुलै २०२६ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नागरिकांना अधिक पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरविण्याच्या उद्देशाने प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भौगोलिक माहिती प्रणालीचे (जीआयएस - GIS)विविध लेअर नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी विकास परवानगी व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक माहितीसाठी आणि दाखल्यांसाठी ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी संबंधित सुविधा तातडीने ऑनलाइन पोर्टलवर कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश महानगर आयुक्तांनी दिले. या अद्ययावत ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या अचूक माहिती मिळणे सुकर होणार आहे.
सामान्य नागरिक, वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांचा वेळ वाचून ‘पीएमआरडीए’च्या एकूणच कामकाजात तसेच विकास परवानगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व गतिमानता येणार आहे. या सर्व सुविधा लवकरात लवकर ‘पीएमआरडीए’च्या अधिकृत पोर्टलवर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, विकास परवानगी विभागाच्या उपसंचालक स्मिता कलकुटकी यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.
- डिजिटल प्रशासन, Digital Governance, ई-गव्हर्नन्स, E-Governance
- भौगोलिक माहिती प्रणाली, ऑनलाइन सेवा, Online Services, नागरिक सुविधा, Citizen Services
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, GIS Layer, Geographic Information System
- GIS System, पीएमआरडीए, PMRDA, Pune Metropolitan Region Development Authority