बलात्कार व पोस्को गुन्हयातील १० वर्षापासून फरार आरोपीस कर्नाटकातून अटक, गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
बलात्कार व पोस्को गुन्हयातील १० वर्षापासून फरार आरोपीस कर्नाटकातून अटक, गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी, ता. २३ जुलै २०२६ - बलात्कार व पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्हयातील गेल्या १० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले आहे. हनुमंत दुर्गाप्पा कुऱ्हाडे (वय ३४ वर्षे, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत कुऱ्हाडे याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६, पोस्को अॅक्ट कलम ४. ५ (जे) (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी कर्नाटक राज्यामध्ये असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर, आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी त्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा, आरोपी हा कुरागुंड, ता. रानेडेन्नूर, जि. हावेरी, राज्य कर्नाटक येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी पोलिस उप-आयुक्त श्री रोहिदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या आदेशान्वये पथक तयार करण्यात आले.
पथकाने आरोपी हनुमंत कुऱ्हाडे याला कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील रानेडेन्नूर येथून ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीकामी निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे रोहिदास पवार, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे-२ सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, रमेश मावसकर, भुपेंद्र चौधरी, निलेश जाधव यांचे पथकाने केली आहे.