हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस राज्यभरात पावसाचा इशारा
पुणे, ता. ३१ - राज्यभरात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना वादळी पाऊस व गारपिटीच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुढील पाच दिवसांत नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, दक्षिण महाराष्ट्रात वादळी ढग दाटून येत आहेत तसेच पूर्व विदर्भ, उत्तर तेलंगणा आणि छत्तीसगड भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या वादळी ढगांची निर्मिती होत आहे, असे हवामान विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक आणि दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाहात खंड पडल्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.