राज्य सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

राज्य सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

राज्य सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे 

पुणे, ता. १ - मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज, शनिवारी (ता. ३० मे)  आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शेतात रणरणत्या उन्हात आमरण उपोषण सुरु केले होते.  उष्माघाताने आपला बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. शनिवारी रात्री  मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली, अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर, रात्री साडेदहा वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी मध्यरात्री 1.15 वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतले आहे.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ''अनेक विषय राज्य सरकारकडून मान्य झाले. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला. तसेच मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आहेत. त्याच्यावर आता लगेच आम्ही पुढच्या दोन-तीन दिवस शासन निर्णय काढून सुरुवात करणार आहोत.''

मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासन दिली आहेत, ती सर्व तुमच्या समोर (माध्यमांसमोर) दिली. कोणतेही आश्वासन मागे दिलेले नाही. आम्ही दिलेली आश्वसनं मनोज जरांगे यांनी देखील वाचून दाखवली आहेत. सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे, त्यानुसारच कार्यवाही केलेली आहे.''

मनोज जरांगे यांच्या मान्य झालेल्या मागण्या.....
- 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार
- नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार
- जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांत बैठक घेणार
- सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ
- न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ
- प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन
- आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन
- मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories