सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे उद्या पुण्यात ‘माऊली’या विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे उद्या पुण्यात ‘माऊली’या विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘माऊली’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
‘माऊली’ हा संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासावर आधारित नाट्यमय सांस्कृतिक आविष्कार असून, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, अध्यात्म, भक्ती, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश प्रभावी रंगमंचीय सादरीकरणातून उलगडण्यात येणार आहे. संगीत, अभिनय, नृत्य आणि नेपथ्य यांच्या सुरेख संगमातून संत परंपरेचा वैभवशाली वारसा रसिकांसमोर साकारला जाणार आहे.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्य, विचार आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला समता, करुणा, विश्वबंधुत्व आणि मानवकल्याणाचा संदेश दिला. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा त्यांच्या पसायदानमधील सार्वकालिक संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांचे जीवनकार्य आणि त्यांची आध्यात्मिक परंपरा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, ‘माऊली’ हा कार्यक्रम त्या उपक्रममालिकेतील एक महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या समृद्ध संतपरंपरेचे, आध्यात्मिक वारशाचे आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पुणे व परिसरातील वारकरी, कला रसिक, विद्यार्थी, संशोधक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.