13 गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी मावळमध्ये जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 4 ची कारवाई

13 गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी मावळमध्ये जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 4 ची कारवाई

पिंपरी-चिंचवड : खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आणि इतर गंभीर स्वरूपाचे एकूण 13 गुन्हे दाखल असलेल्या नारायण सोपान दाभाडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने जांभूळगाव येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 4 वर्षांपासून तो पोलिसांना मिळून येत नव्हता. पुढील कारवाईसाठी त्याला उत्तर म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नारायण सोपान दाभाडे (वय 41, रा. जांभूळगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 596/2023 मध्ये दाभाडे याचा शोध सुरू होता. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 326, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.

दाभाडे याच्याविरुद्ध यापूर्वी मोका अंतर्गत तसेच खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी, अपहरण, मारहाण आणि अग्निशस्त्रांचा वापर अशा स्वरूपाच्या प्रकरणांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर सराफी दुकान लुटण्याचा कट, दरोड्याचा प्रयत्न आणि गांजाविक्रीशी संबंधित गुन्हेही दाखल आहेत. या सर्व प्रकरणांसह त्याच्याविरुद्ध एकूण 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसरात आरोपीची दहशत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध सुरू ठेवला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पथकाने या मोहिमेत काम केले.

आरोपीचा शोध घेताना पथकाने तांत्रिक विश्लेषणावर आधारित तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला. या माहितीच्या आधारे जांभूळगाव येथे कारवाई करून दाभाडे याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संबंधित गुन्ह्यातील पुढील कारवाईसाठी त्याला उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार असवले, सोनटक्के आणि मुंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories