बांधकाम साइटवर तरुण कामगाराचा मृत्यू; व्यावसायिकावर गुन्हा दाखल

बांधकाम साइटवर तरुण कामगाराचा मृत्यू; व्यावसायिकावर गुन्हा दाखल

पिंपरी : खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने एका 25 वर्षीय कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील सयाजी पार्क परिसरात गणपत राम गोकुळराम भाटी यांच्या मालकीच्या जागेवर बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. याठिकाणी छताचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी कामगार कमल धुर्वे (वय 25, रा. खरबावाडी, मूळ. मध्य प्रदेश) याचा उंचावरून पडून मृत्यू झाला.  

या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सिताराम विश्वनाथ नेटके (वय 50, रा. चाकण) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कामगारांना हेल्मेट, सुरक्षा जाळी (सेफ्टी नेट), सुरक्षा बेल्ट तसेच सुरक्षा रेलिंग यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.

यामुळे एखादा कामगार उंचावरून पडल्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही संबंधित बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षेच्या उपायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मुंजाजी मोते यांनी 21 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. यानुसार चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories