चार वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या, ६५ वर्षीय नीच नराधम पोलिसांच्या ताब्यात, राज्यभरात संतापाची लाट
चार वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या, ६५ वर्षीय नीच नराधम पोलिसांच्या ताब्यात, राज्यभरात संतापाची लाट
पुणे, ता. २ - पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीव्र संताप आणणारी, अतिशय वाईट घटना घडली शुक्रवारी (ता. १) आहे. साडेतीन वर्षांच्या कोवळ्या बालिकेवर ६५ वर्षीय नीच नराधमाने बलात्कार करुन तिची निघृण हत्या केली. या घटनेने भोर तालुक्यासह सबंध महाराष्ट्रात संताप निर्माण झाला आहे. पुन्हा पुन्हा घडणाऱ्या या बलात्काराच्या घटनांमुळे या महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार काय करतेय, हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात घोंगावत आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे या नराधमाचे दुष्कृत्य उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण नसरापूर आज बंद ठेवण्यात आले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सारे नसरापूर पेटून उठले आहे.
संबंधित चिमुकली सुट्टीसाठी नसरापूर येथे आपल्या आजीकडे आली होती. दुपारच्या सुमारास ती राम मंदिर परिसरात खेळत असताना एका ६५ वर्षीय इसमाने तिला आमिष दाखवून जवळच असलेल्या गोठ्याकडे नेले. त्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता नराधमाने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर मुलगी कोणाला सापडू नये म्हणून तिचा मृतदेह शेणाने झाकला आणि आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
मुलगी बराच वेळ घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी तिचा शोध सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती एका व्यक्तीसोबत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या दिशेने शोध घ्यायला सुरवात केली असता एका गोठ्यात झाकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघड होताच गावात एकच खळबळ उडाली. सदर संशयित व्यक्तीचा शोध घेत असताना तो गावाजवळील नदी परिसरात सापडला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून रास्ता रोको आंदोलन पुकारले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत "आरोपी आमच्या ताब्यात द्या" अशी तीव्र भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या घटनेमुळे सबंध महाराष्ट्र संतापला आहे. गावकऱ्यांनी 'मुका मोर्चा' काढून संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी परिसरात अद्याप तणावपूर्ण शांतता आहे.