देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात पार पडले 'एनडीए'च्या १५० व्या तुकडीचे दीक्षांत संचलन
देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात पार पडले 'एनडीए'च्या १५० व्या तुकडीचे दीक्षांत संचलन
पुणे, ता. १ - देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १५० व्या तुकडीचे दीक्षांत संचलन शनिवारी (ता. ३०) पार पडले. महिला छात्रांच्या तिसऱ्या तुकडीचा संचलनातील सहभाग लक्षवेधी ठरला. 'एनडीए'च्या खडकवासला येथील खेत्रपाल मैदानावर हा समारंभ झाला.
दीक्षांत संचलन समारंभासाठी भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख अतिथी होते. 'एनडीए'चे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, डेप्युटी कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि छात्रांचे पालक समारंभाला उपस्थित होते.
जनरल द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली आणि छात्रांना मार्गदर्शन केले. संचलनात एकूण एक हजार २५० छात्र सहभागी झाले होते. त्यापैकी १५० व्या तुकडीचे उत्तीर्ण झालेले ३५३ छात्र होते. यामध्ये १२ मित्र राष्ट्रांमधील २४ छात्रांचाही सहभाग होता. परेडचे नेतृत्व अकादमी कॅडेट कॅप्टन (एसीसी) मयंक चौधरी याने केले. 'सुखोई-३०' या लढाऊ विमानांनी दिलेल्या मानवंदनेने संचलनाचा समारोप झाला.
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मार्गदर्शन - द्विवेदी म्हणाले, "एक उत्तम अधिकारी होण्यासाठी कौशल्य, दृष्टिकोन, जुळवून घेण्याची क्षमता या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सभोवतालची परिस्थिती वेगाने बदलत असतानाही आपल्या मूळ ध्येयापासून आपण दूर जाता कामा नये. कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेत सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचे कौशल्य असले पाहिजे.
आजचे युद्धक्षेत्र पूर्णपणे बदलले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताने आपला दृढ निश्चय आणि अचूक कारवाईचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र मिळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे."