१ जुलैपासून लागू झालेल्या ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१ जुलैपासून लागू झालेल्या ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१३ हजार १४१ मालमत्ताधारकांनी घेतला लाभ
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावीपणे होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मालमत्ताधारकांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे, नागरिकांचा वेळ वाचावा तसेच कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने १ जुलै २०२६ पासून ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. ही योजना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
१ एप्रिल २०२६ ते २२ जुलै २०२६ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत महापालिकेकडे ५४७ कोटी ९ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, १ जुलैपासून सुरू झालेल्या ४ टक्के सवलत योजनेचा अवघ्या २२ दिवसांत १३ हजार १४१ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे ऑनलाईन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत आहे. या मालमत्ताधारकांनी १५ कोटींचा ऑनलाईन भरणा केला आहे.
कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाकडून व्यापक प्रचारमोहिम राबविण्यात येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडिओ, जनजागृती संदेश विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय दररोज सुमारे १ ते ३ लाख मालमत्ताधारकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून ४ टक्के सवलत योजनेची माहिती दिली जात असून, मुदतीपूर्वी ऑनलाईन कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ४ टक्के सवलतीची मुदत उपलब्ध असल्याने ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता ऑनलाईन कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे.....
''पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिकेने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी ४ टक्के सवलत उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत ऑनलाईन मालमत्ता कर भरावा आणि जबाबदार नागरिक म्हणून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.''
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
सवलतीचा लाभ घ्यावा आणि पुढील कारवाई टाळावी....
''महापालिकेकडून मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार जप्ती कारवाईसह अन्य कायदेशीर उपाययोजनांसाठी आढावा बैठक घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाईन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा आणि पुढील कारवाई टाळावी.''
- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका